Thursday, February 26, 2026
Homeपुणेदापोडीत शाहू महाराजांची जयंती उत्साहात संपन्न

दापोडीत शाहू महाराजांची जयंती उत्साहात संपन्न

बहुआयामी प्रभावी व्यक्तिमत्व घडवा….. . डॉ. शांतीपाल ओहोळ

पुणे : नागलोक असोसिएशन पुणे आणि महाविहार माजी विद्यार्थी सोशल वेल्फेअर असोसिएशन यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दि.6/7/2025 रोजी साजरी केली. त्रिरत्न हॉल, स्पर्धा परीक्षा केंद्र दापोडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना करियरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विचारमंचावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सेवानिवृत्त सनदी अधिकारी मा.आर.के.गायकवाड,सिओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी चे प्रोफेसर विभाग प्रमुख डॉ. शांतीपाल ओहोळ तसेच लक्ष्मणराव आपटे प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य गौतम मगरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गाणार हे उपस्थित होते.

सुरुवातीला या मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमाचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत नागलोक असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम गाणार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.इंगोले यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. त्यानंतर विजय चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी सनदी अधिकारी मा. आर. के. गायकवाड साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शाहू महाराजांनी बाबासाहेबांना आपल्यासमोर नेता म्हणून आणायचे फार मोठे काम केले आहे. त्यामुळे राज्यांमध्ये व देशांमध्ये बाबासाहेबांना मान्यता मिळाली. बाबासाहेब हे देशाचे भविष्य आहेत हे दाखवून दिले. शाहू महाराजांनी अनेक लोक उपयोगी कायदे तयार केले. समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अनिष्ट रूढी परंपरा बंद केल्यात. आरक्षणाची व इतर सर्व कलमे बाबासाहेबांनी नंतर राज्यघटनेमध्ये आणली.

शाहू महाराजांचे कार्याचे आपण सिंहावलोकन करुन ते पुढे नेले पाहिजेत. सांस्कृतिक परिवर्तन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे. लंडन येथे बाबासाहेब बॅरिस्टर पदवीचा अभ्यास करत असतांना जे निवास होते ते निवास विकत घेण्याचा प्रस्ताव माझ्या कारकिर्दीमध्ये करण्यात आला. त्याचप्रमाणे बार्टीद्वारे प्रशिक्षण संस्था निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उज्वल यशा साठी बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.

यानंतर डॉ. शांतिपाल ओहोळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण पद्धती सध्या अवघड झाली आहे.त्यात अामुलाग्र बदल झालेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात संधी निर्माण होत आहेत. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण व ज्ञान नाही.तर त्यासाठी योग्य दिशा फार महत्त्वाची आहे. इंजीनियरिंग क्षेत्रात स्वतःच्या मनाचा कल बघा, कॉम्प्युटरचे विविध कोर्सेस आहेत पण त्यासोबत करियर घडवताना मल्टी स्किल्ड झाले पाहिजे. सर्वांगीण प्रगती केली पाहिजे. बहुअंगी झाले पाहिजे, बहूआयामी प्रभावी व्यक्तिमत्व घडविले पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढ्या संधी उपलब्ध नाहीत. राजापेक्षा विद्वानांची पूजा सर्वत्र होते म्हणून चारित्र्यसंपन्न विद्वान व्हा !वेगवेगळे नवीन संधी व आव्हाने विद्यार्थी व पालकांनी ओळखली पाहिजेत. त्यांनी पुढे सांगितले की, जसे एखादी वनस्पती जमिनीमध्ये वाढते, त्याचप्रमाणे समजा ती माती आई वडील आहेत पाणी हे समाजाचं रूप आहे, जसे खत दिल्याशिवाय झाड वाढत नाही त्याचप्रमाणे संस्काराची सुद्धा जोड आपण दिली पाहिजे. चांगले संस्कार विद्यार्थ्यांच्या वर झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी मैत्री जोपासली पाहिजे हे सांगताना त्यांनी बाबासाहेबांचे उदाहरण दिले. नवल भदेना हे कोलंबियांमध्ये बाबासाहेबांच्या सोबत शिकायला होते. त्यांनी गोदरेज कंपनीची जाहिरात मूकनायक साठी दिली होती. तसेच ग्रेज इन लंडनला बाबासाहेब दुसऱ्यांदा गेले तेव्हा पाच हजार रुपयाची मदत केली होती. स्टॉक एक्सचेंजची कंपनी काढण्यासाठी बाबासाहेबांना त्यांनी मदत केली होती. परंतु समाजाच्या हितासाठी बाबासाहेब कोणतीही तडजोड करीत नाहीत हे त्यांना माहिती होते. त्यामुळे कोणत्याही बाबींमध्ये भदेना मध्यस्थी करायला तयार होत नव्हते. इतकी चांगली मैत्री नवल भदेना आणि बाबासाहेबांच्या मध्ये होती. यावेळी त्यांनी दुसरे एक उदाहरण दिले ते बाबासाहेबांचे मित्र कर्मवीर भाऊराव पाटील यांचे. कर्मवीर नेहमी म्हणायचे की,”तुम्हाला एक वर्षाची तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, दहा वीस वर्षाची तरतूद करायची असेल तर फळझाडे लावा आणि शंभर वर्षाची तरतूद करायची असेल तर माणसं घडवायला शिका” हे त्यांचे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतर प्रा. गौतम मगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या कार्याचा उल्लेख केला. ताकदवान व कमजोर घोड्यांचे उदाहरण, ऐतिहासिक माणगाव परिषद, बाबासाहेबांचा सत्कार, शोषित वंचितांच्या साठी कार्य होस्टेल बोर्डिंगची व्यवस्था, गंगाराम कांबळे यांच्या जीवनातील प्रसंग व इतर घटनांचा त्यांनी आढावा घेतला.

यानंतर अध्यक्ष मनोगतात पुरुषोत्तम गाणार यांनी सांगितले की,” विद्यार्थ्यांनी करिअर करताना कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे. केवळ एकाच प्रकारचे शिक्षण घेऊन चालणार नाही तर तंत्रज्ञान सुद्धा आत्मसात केले पाहिजे व त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करता आला पाहिजे. आता या जगामध्ये अत्याधुनिक अशी उपकरणे आलेली आहेत परंतु ती दुरुस्ती किंवा देखभाल करणे यासाठी कौशल्य आले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घ्यावेत. इंजिनीयर होण्याऐवजी एखादा कारागीर ,कामगार होणे, तंत्रज्ञ होणे याला कमी लेखू नका. याही क्षेत्रामध्ये भरपूर वाव आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यानंतर विजय चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन रवींद्र इंगोले यांनी केले. यावेळी धम्मचारी ज्ञानराजा, अंबादास खाडे, बुवासाहेब अहिवळे, प्रतीक्षा कांबळे, कैलास गजभिये, यश नितनवरे, राजकुमार पाटील, अॅड. विलास गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments