Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रसक्षम सेवाभावी संस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सक्षम सेवाभावी संस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मूकनायक विषेश….. प्रकाश लांडगे 9920806563

औरंगाबाद, दि. २३ ऑगस्ट २०२६ : सक्षम सेवाभावी संस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त सामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी करण्यात आले. सक्षम सेवाभावी संस्था आणि हेडगेवार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये १५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली.

या शिबिराचे उद्घाटन व मार्गदर्शन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विलास बापू भुमरे गटातील आप्पासाहेब पाटील तसेच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुंढे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी सक्षम सेवाभावी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत समाजातील गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

सक्षम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सँडी गुरु यांच्या पुढाकारातून हे आरोग्य शिबिर विशेषतः मागास व गरजू भागातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते. आर्थिक परिस्थिती, आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव तसेच दैनंदिन जीवनातील विविध अडचणींमुळे अनेक महिला आणि नागरिक आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला.

शिबिरामध्ये नागरिकांची विविध प्रकारची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तपासणीनंतर गरजेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून, वेळेवर तपासणी आणि योग्य वैद्यकीय सल्ला मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला.

सक्षम सेवाभावी संस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि गरजू नागरिकांना प्रत्यक्ष मदत करण्याचा संस्थेचा प्रयत्न दिसून आला. आगामी काळातही समाजातील गरजू घटकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सँडी गुरु यांनी सांगितले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सक्षम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सँडी गुरु यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल हेडगेवार रुग्णालयाच्या डॉक्टर व वैद्यकीय पथकाचेही संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments