पुणे : नागलोक नारीशक्ती संघ यांचे वतीने नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी,पुणे येथे 7 फेब्रुवारी रोजी महानायिकांची संयुक्त जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विचार मंचावर प्रमुख पाहुणे वाडिया कॉलेजच्या प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर प्रा सुनंदा काटे, अस्मा शेख, प्रिया नप्ते मंगल सावंत ह्या उपस्थित होत्या.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते या महानाईकांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. इशा नाबरिया यांनी स्वागत नृत्य सादर केले. अंजना गायकवाड व निवेदिता बेंद्रे यांनी रमाई गीत व रूपाली खैरे यांनी रमाई हे नृत्य सादर केले .कुमारी साची सराटे यांनी भाषण दिले. त्यानंतर “विश्व घडवणाऱ्या राष्ट्रमाता” या विषयावर नाटिका सादर करण्यात आली. यामध्ये राजमाता जिजाऊ, यांच्या भूमिकेत शितल पाथर्डे, बाल शिवाजी च्या भूमिकेत आमंती पाथर्डे,सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत यशोधरा नितनवरे, फातिमा शेख यांच्या भूमिकेत अंजली अभ्यंकर आणि माता रमाई यांच्या भूमिकेत त्रिशीला वाकोडे यांनी जिवनपट सादर केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अस्मा शेख यांनी फातिमा शेख यांच्या कार्याविषयी व्याख्यान दिले.
प्रिया नप्ते या आंतरराष्ट्रीय युवा प्रबोधनकाराने “माता रमाई” या विषयावर व्याख्यान दिले. वाडिया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी माता सावित्री बाबत व्याख्यान दिले. त्यांनी सांगितले की,” रमाईने जी ताकद निर्माण केली, त्यामुळेच बाबासाहेबांना महान कार्य करता आले. समाज व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्री व तिची सहकारी फातिमा शेख, त्यागमूर्ती रमाई यांच्यासारखेच आज महिलांनी उभे राहिले पाहिजे. आपल्या मुलांना ऑनलाइन, इंटरनेट, कॉम्प्युटरचे ज्ञान व त्याचा उपयोग करायला शिकवले पाहिजे. तरच ते पुढे जातील, नाहीतर त्यांना या व्यवस्थेच्या गावकुसाबाहेर राहावं लागेल. सध्याच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी सर्वच आव्हानांना सामोरे गेले पाहिजे, मुलांना चांगली स्वप्ने दाखवा, त्यांना व्यसनापासून दूर ठेवा. बाबासाहेबांनी रमाईला सांगताना म्हटले होते की, स्वतंत्र पंढरपूर निर्माण करू या आणि त्याप्रमाणे त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरला दीक्षाभूमीवर शुभ्र जनसागरासमोर क्रांती घडवली. विद्यार्थ्यांनी व्हिजन ओळखून, हातात हात घेऊन ,मानवी साखळी तयार करून प्रगती केली पाहिजे.” मा.सौ.मंगल सावंत यांनी व्याख्यान दिले. त्यांनी सांगितले की,” हा कार्यक्रम इतिहास घडवणारा आहे, याची नोंद घेतली जाईल.
भगवान बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, सावित्री आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला आणि रणरागिनी तयार झाल्या राजमाता जिजाऊ सावित्री फातिमा आणि रमाई यांनी स्त्री मुक्तीसाठी आंदोलन केले. हा विचारांचा जागर आहे म्हणून त्यांचे राहिलेले कार्य आपण पूर्ण करायचे आहे. ज्याप्रमाणे महात्मा फुले व सावित्रीला फातिमा शेख आणि त्यांचे भाऊ उस्मानभाई शेख यांनी सावलीसारखी मदत केली. त्याचप्रमाणे आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.”कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रा. सुनंदा काटे यांनी सांगितले की, “महानायिकांनी आपले आयुष्य समाज सुधारण्यासाठी वेचले. कोणताही स्वार्थ साधला नाही, समाज कसा घडला पाहिजे हे बघितले. आपण मुलांना सभ्यता, विनम्रता व शील सांभाळायला शिकवल पाहिजे. यशाने हुरळून न जाता पुढील यशस्वी वाटचाल केली पाहिजे. मुले आईचे अनुकरण करतात म्हणून त्यांच्यासमोर टीव्ही आणि मोबाईलच्या वापराचा अतिरेक टाळावा. माणसाने माणसाशी माणसासारखे राहिले पाहिजे. चांगल्या लोकांची संगत करून बिघडलेल्या लोकांना सुधरवले पाहिजे. आपण असंख्य दीप दीपाने पेटवू. ”
यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व संस्थांचा रमाई पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
अर्थदीप महिला सहकारी पतसंस्थाच्या अध्यक्षा श्रीमती रंजना नितनवरे ,स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या प्रमुख श्रीमती मानसी वानखडे ,श्रीमती शीला गंगावणे, भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवडच्या माजी अध्यक्षा श्रीमती रेखा ढेकळे, सावित्रीबाई फुले महिला संस्थांच्या अध्यक्षा सौ.सुजाता निकाळजे, बोधिसत्व सहकारी रुग्णालयच्या संचालिका डॉ.मंगल आयरेकर (इंजे) ,डॉ. उज्वला बेंडे यांना “रमाई पुरस्कार” देण्यात आला. यावेळी आभार प्रदर्शन डॉक्टर अंजली अभ्यंकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा मोरे यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.यशोधरा नितनवरे ह्या होत्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुष उपस्थित होते.

