कराड प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कराड नगरपालिकेने २ जानेवारी, १९४० रोजी मानपत्र प्रदान केल्याच्या तसेच त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन महारवाड्याला भेट दिल्याच्या घटनेला आज ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवसाच्या स्मृती दिनानिमित्त समता सामाजिक विकास संस्थेच्या वतीने, भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या प्रांगणात या समता परिषदेचे आयोजन केलेले होते.
सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके, संविधान अभ्यासक मा. ऍड. संभाजीराव मोहिते, महाराष्ट्र राज्य भाषा व संस्कृती मंडळ, माजी सदस्य फरझाना इकबाल, त्याचबरोबर मा. प्राचार्य बी. एन. कालेकर आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विचारवंत, लेखक आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते
प्रा. सुकुमार कांबळे, सर उपस्थित होते.
परिषदेच्या सुरुवातीस समता परिषदेचे संयोजक आनंदराव लादे यांनी 3 ऐतिहासिक आणि महत्त्वाचे ठराव मांडले त्यानंतर धर्मांध संस्थेच्या वतीने खोडसाळपणे आयोजित केलेल्या बंधुता परिषदेचा तीव्र निषेध करून, तत्कालीन केसरी पेपर मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या धर्मांध संस्थेस दिलेल्या भेटीचा खोटा पुरावा फाडून त्याला पत्रकार विजय मांडके यांच्या हस्ते केराची टोपली दाखविण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी आपल्या मनोगतात, बाबासाहेबांचे चरित्रकार लेखक चांगदेव खैरमोडे आणि महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या पुस्तकांतील संदर्भ देऊन सप्रमाण बाबासाहेबांच्या ऐतिहासिक महारवाड्यातील भेटीचा दाखला देऊन, बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचा जागर केला.
प्रा. सुकुमार कांबळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्कालीन महारवाड्याच्या भेटीच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे स्मरण करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध कोणत्याही कट्टरवादी धार्मिक संस्थेसोबत जोडायचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही अशी ताकीद देऊन, बंधुतेच्या नावाखाली घोर फसवणूक करण्यात येत असल्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे देऊन अशा धार्मिक संस्थांचा निषेध नोंदवून डॉ. बाबासाहेबांच्या समतावादी विचारांसाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर अशा सनातनी डांबिस टोळीचे डाव हाणून पाडण्यासाठी सर्वतोपरी लढा देण्याचा एल्गार या समता परिषदेत करण्यात आला.
समता परिषद संयोजन समितीने अतिशय नेटकेपणाने कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

