दि.6 डिसेंबर 2025 रोजी बुद्धघोष बुद्धविहार, बुद्धघोष हौसिंग सोसायटी या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगवी पूर्व, बुद्धघोष हौसिंग सोसायटी, तक्षशिला महिला संघ, त्रिरत्न ग्रुप यांचे विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्रमुख अतिथी प्रा. समाधान भडकुंबे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बौद्धाचार्य सुरेश शिंदे, अशोक काळे यांनी सामूहिक वंदना घेतली. या अभिवादन सभेत प्रमुख वक्ते प्रा. समाधान भडकुंबे यांनी बाबासाहेबांच्या योगदानाबाबत विचार मांडले ते म्हणाले की, “बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना सामाजिक क्रांतीचे प्रतीक मानत होते. महात्मा फुले, शाहू महाराज यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी कार्य केले. समाजाचा विकास हा व्यक्तीच्या वैयक्तिक विकासातून उदयास येतो. स्वाभिमान अभिमान गहाण ठेवून मिळालेली ऊर्जा टिकाऊ राहत नाही. राजकारण हे बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून क्रीडा नव्हे तर मिशन आहे. प्रत्येक कुलपाची वा समस्येची चावी ही सत्तेचे दरवाजे उघडते. राजकीय सत्ता असल्याशिवाय बहूजनांची आर्थिक प्रगती प्राप्त होणार नाही. राजकारणाच्या माध्यमातून लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये बदल करता येतो. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकांची आर्थिक समृद्धी झाली पाहिजे. बाबासाहेब खूप जिद्दी होते. मनात आणलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी केली. सम्राट अशोकानंतर बाराशे वर्ष बुद्ध माहिती नव्हते, ते बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन करून सांगितले. धर्माचा पगडा येथील विषमतावादी व्यवस्थेवर आणि लोकांवर आहे. म्हणून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा बौद्ध धम्म स्वीकारला. त्यांनी शांती, समतेचा, विज्ञानवादी धम्म दिला. बाबासाहेबांनी जगण्यांचा सिद्धांत शिकविला. शिल संपन्न चारित्र्याला महत्व दिले. घटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार दिले. सध्या प्रशासनिक लोकशाही आहे, ती लोकांच्या आचरणामध्ये असावी. ती केवळ बोलण्यात किंवा कागदोपत्री नसावी. जे अधिकार आधी हिरावून घेतले होते ते अधिकार संविधानाच्या माध्यमातून देऊन बाबासाहेबांनी विश्वास निर्माण केला व लोकांना ऊर्जा दिली .बाबासाहेबांच्या जीवनामध्ये लहानपणी आईचे निधन झाल्यामुळे आईचं प्रेम मिळालं नाही, आईची माया मिळाली नाही. परंतु त्यांनी समाजाला आईसारखे प्रेम दिले. आपण बाबासाहेबांच्याकडे श्रद्धेने आई व वडीलही म्हणून बघतो. बाबासाहेब देव नाहीत पण देवापेक्षा कमी नाहीत. त्यांनी देवा पलीकडचे काम केले. खरं स्वीकारण्याची ताकद निर्माण केली. आज बाबासाहेब हयात नाहीत परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा व छाप प्रत्येक ठिकाणी आहे.आपली ही ताकद आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर निघालेली अंत्ययात्रा ही जगातील सर्वात मोठी होती .प्रत्येक घरातील व्यक्ती पोरकी झाली होती. आज आपण बघतो ज्या बाबासाहेबांचे जीवन महाराष्ट्रात गेले तिथे बहुजन समाज सत्तेपासून वंचित आहे. इतर राज्यांमध्ये सत्ता स्थापन झाली, मोठे मोठे पार्क उभे राहिले, बाबासाहेबांच्या नावाने गाव, कॉलेज निर्माण झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये वंचित शोषित लोकांची राजकीय चळवळ खऱ्या अर्थाने उभी राहिली नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल.” यानंतर अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. रवींद्र इंगोले यांनी सांगितले की, “बाबासाहेबांचे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत. भारत बौद्धमय बनविणे, समताधिष्ठित लोकशाही प्रस्थापित करणे, तसेच संविधानाचे पालन व सन्मान राखणे महत्त्वाचे आहे.” सध्या या विहारांमध्ये संविधान साक्षरता अभियान चालू आहे त्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. तसेच प्रत्येक रविवारी विहारात गेले पाहिजे, हे त्यांनी आवाहन केले. यानंतर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या अभिवादन सभेसाठी बुद्धघोष हौसिंग सोसायटीचे चेअरमन शरद जांभळीकर, अरुण रणदिवे, ज्ञानेश्वर खाडे, चंद्रकांत दुर्गे, ऋषिकेश कांबळे, सिद्धांत कांबळे ,अशोक काळे, सुरेश शिंदे, अर्जुन जगताप, सुनीता मोहिते, पत्रकार विजय गायकवाड व इतरांनी मोलाचे सहकार्य केले.

