Thursday, February 26, 2026
HomeUncategorizedनेतेगीरीचा साज अन् राजकारणाचा 'गुंडा' राज

नेतेगीरीचा साज अन् राजकारणाचा ‘गुंडा’ राज

विकास साळवे,पुणे

सहसंपादक

9822559924..✍️

एकमेकांबद्दल आकांड तांडव,धर्म द्वेष,आरोप प्रत्यारोप,शिवराळ भाषा,हे सगळं राजकारण फक्त नि फक्त फिरतं ते सत्तेच्या भोवती आणि सरकारी तिजोरी भोवती,जनतेच्या सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांचं कुठल्याच नेत्याला तथा राजकीय पक्ष संघटनेला काहीही देणंघेणं नाही.राजकारणातून समाजकारण हा फक्त दिखावा आहे,राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून स्वार्थ हे एक राजकारणाचं समिकरण बनलं आहे.असंच सध्याच्या देशाच्या अन् राज्यातल्या घडामोडींवरून दिसत आहे.कोणी कुठल्याही पक्षात जा फक्त सरकारी तिजोरीवर आपलाच हक्क असू द्या,वाटाघाटीला फक्त आपणच राहू ,असंच जणुकाही सगळ्या राजकीय पक्ष संघटनांनी ठरवून टाकलं असल्याचे सध्याते चित्र आहे.ही अत्यंत नीच प्रवृत्ती राजकीय नेत्यांमध्ये दिसून येत आहे.देशातल्या व राज्यातल्या विकासात्मक गोष्टी या फक्त दिखाव्यापुरत्याच शिल्लक राहील्यात की काय असे हल्ली वाटायला लागले,कारण विकासात्मक कामाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात निविदा काढायच्या त्या कागदावर दाखवायच्या अन् त्या भ्रष्टाचाराच्या ओझ्यातच विकासकामांना दाबून टाकायचं,अर्थात टक्केवारीत दबून जायचं,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आणि म्हणून महीनाभरापुर्वी तयार केलेला रस्ता बील निघाले की,की,हळूच पुढची निविदा काढायला रस्ता उखडायला सुरूवात होते,परंतु त्या रस्त्यावर झालेला प्रचंड खर्च मात्र त्या रस्त्याच्या साहीत्यासाठी नाही तर भ्रष्ट नेत्यांच्या सुख सुविधांसाठी तथा प्रचंड प्रमाणात नेत्यांची नेत्र दिपक संपत्तीत वाढ होण्यासाठी खर्च होते.ही वस्तुस्थिती आहे.अशा राज्यात,शेतकरी,
बेरोजगार तरूण स्वहत्या करणार नाहीत तर काय करणार?
जिवंतपणी वेदनेनं भरलेलं दु:ख विव्हळत बसण्यापेक्षा मेलेलं बरं असं म्हणून ही लोकं स्वत:ला संपवून घेतात आणि या मेलेल्यांचं राजकीय सांत्वन करतांना वरतोंड करून नेते मंडळी त्यावर खिदळत राजकारण करतात.संवेदना हरवलेली हीच मस्ताडलेली नेते मंडळी निवडणुकीत गैरकारभारातून कमावलेल्या पैशात मतदार विकत घेऊन निवडूण येतात अन् सत्तेच्या सारीपाटावर ठाण मांडून बसतात.एवढेच नव्हे तर देशातल्या संसदेत व राज्यातल्या विधानसभेत खासदार आमदारांची जर का माहीती घेतली तर असा एकही नेता (अपवाद वगळता) निष्कलंक सापडणार नाही,अर्थात ही सगळी नेतेमंडळी गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी वृत्तीची आहेत.असे आढळून येईल,अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी वृत्तीची नेते मंडळी जर संसद व विधानसभेसारख्या पवित्र स्थळी जावून बसत असतील आणि स्वार्थी राजकारणासाठी गंभीर स्वरूपाची गुन्हे करणारे गुन्हेगार पोसत असतील तर मग सर्व सामान्य जनतेचे काय होणार ?
हाच मोठा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
आणि ही राजसत्ता व शासकीय तिजोरीवरचा हक्क अबाधित कसा ठेवता येईल म्हणून पोसलेल्या गुन्हेगारांकरवी सर्वसामान्य जनतेवर दहशतीने पाळत ठेवायची,धर्माच्या नावावर दंगली घडवून तर कधी शेतक-यांच्या स्वहत्या घडवून, बेरोजगारीच्या प्रश्नांवर तर कधी महीलांवर बलात्कार घडवून,तर कधी कुणाची हत्या करून तर कधी बाँम्बस्फोट करून अशा विविध घटनांनी देश व राज्य सतत दहशतीत ठेवायचा,जनतेचं लक्ष फक्त इकडे तिकडे भटकत ठेवायचं हाच अजेंडा या नेते मंडळींचा दिसत आहे.एक घटना झाली की दुसरी घटना असे एका मागोमाग अशा अनेक घटनांमध्येच जनतेला गुरफटवून टाकायचं आणि आणि आपली भाकरी भाजून घ्यायची हेच चित्र या देशात आणि राज्यात सातत्याने बघायला मिळत आहे.संविधानिक असलेल्या शासकीय संस्था देखील या भ्रष्ट कारभारामध्ये सामील होऊन सत्ताधा-यांच्या हातचे बाहूले बनले आहेत.अतीशय भयानक परिस्थिती देशाची झाली आहे,
‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ कारण कुणीच इथे निष्कलंक नाही,फरक फक्त एवढाच,
सत्ताधा-यांचा वाटा मोठा अन् विरोधकांचा थोडा छोटा,अशाच काहीशा वाटाघाटी करून तर हे जगत नसतील ना ?
विकास कामाचा वाटा २०% अन् बाकी वाटाघाटी ८०% असंच काहीसं चित्र बघायला मिळत आहे.म्हणून आजवर हा देश व राज्य नफ्या न राहता सतत कर्जबाजारी होत चालला आहे आणि नेते मंडळी मात्र गडगंज बनत चालले आहेत,
‘इथे उपाशी मरणारा व्याकूळ होऊन मेला तर जनतेच्या प्रश्नांसाठी सत्तेत पाठवलेला तुपाशी खाऊन फुगला’
कुठे भाजीवाला तर कुठे पट्टेवाला,
कुठे पान टपरीवाला तर कुठे अँटो रिक्षावाला,
अबब कुठून आला यांच्याकडे हा प्रचंड एवढा पैसा ?
‘जो जळता जळेना,अन् जाळाला तर विझता विझेना’
कोणते असे कष्ट होते की त्या कष्टाचा मोह ही यांना आवरेना..
देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणा-या सैनिकांची आजही परवड होत आहे,सैन्यांच्या साहीत्यातही भ्रष्टाचार होत आहे,
जगण्यासाठी देण्यात येणारे जेवनही निकृष्ट दर्जाचे,
किती ही अवेहलना,
अन् किती ही संवेदना हरवलेली नेते मंडळी..
तरीही लटकेच का होईना हा माझा भारत देश महान म्हणायचा आणि नेत्यांच्या नावाने जयघोष करायचा,हे जरा अतीच होतंय म्हणावं का ?
आम्ही भक्तीनं टाळ कुटावं,कोसो मैल आम्ही पायी वारीत चालत जावं,आणि अलीशान गाड्याड्यातून आलेल्या पांढरपेशा प्रस्थापितांना व्हीआयपी दरवाजाने कथीत देवानं दर्शन द्यावं हे काही माझ्यासारख्या विवेकी वृत्तीच्या व्यक्तीला पचनारं नाही,कारण कोसो मैल वारीत पायी जाणारांच्या भक्तीला काहीच अर्थ नाही असंच म्हणावं लागेल ?
असेच काहीसे राजकारणात दिसत आहे,वर्षानु वर्ष कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची भक्ती करायची,विरोधक अंगावर घ्यायचे,प्रसंगी अंगावर नाहकपणे गुन्हे दाखल करून घेऊन आयुष्य उध्वस्त करून घ्यायचे,
मात्र आपल्या नेते मंडळींनी विरोधकांच्या गळ्यात हात घालून मस्त फिरायचे तथा अलीशान हॉटेलमध्ये जेवन करायचे,कार्यकर्त्यांनी मात्र कधी वडापाव तर कधी भजीपाव तर कधी उपाशीपोटी नेत्यांसाठी आपसांत एकमेकांची डोकी फोडत आयुष्यभर लढत बसायचे,
अर्थात याही भक्तीला निरर्थक भक्ती समजायची का ?
असाच प्रश्न मला पडल्यावाचून राहत नाही.
नैतीकता,प्रमाणिकता व निष्ठा या फक्त कार्यकर्त्यांनीच पाळायच्या,नेत्यांना मात्र हा नियम तथा कायदा लागू नाही असंच आता कार्यकर्त्यांनी समजून घ्यायचं,बस्स..
सत्तेसाठी व पर्यायाने सत्तेतल्या सरकारी तिजोरीवर ताबा मिळविण्यासाठी वैचारीकतेला माती गाडायचे,लोक प्रतिनिधी म्हणून सभागृहात जायचे अन् गुंड मवाल्यांसारखं वर्तन करायचे,ही भयंकर परिस्थिती देशाच्या राजकारणाची झाली आहे.नेतेगीरीचा साज चढवून राजकारणाचा ‘गुंडा’राज झाला आहे..

- Advertisment -

Most Popular

Recent Comments