मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे
कोल्हापूर, दि.12: आज १२ जून २०२५ रोजी कोल्हापूर येथील दरबार लोकशाहीर, शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांच्या निवासी संकुलात एक अत्यंत प्रेरणादायी, जाज्वल्य आणि ऐतिहासिक क्षण साकार झाला.वाळवा तालुक्यातील पेठ गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी मा. श्री. मदन पवार (तात्या) यांनी आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांचा एका आगळ्यावेगळ्या सत्कारसोहळ्यात गौरव केला.
ग्रामसंस्कृतीतून घडलेल्या, मेंढपाळाच्या झोपडीतून संविधानाच्या राजमार्गावर चालत देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेपर्यंतचा प्रवास करणारे बिरदेव डोणे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाही, तर भारतीय संविधानाच्या मूळ मूल्यांचं चालतं-बोलतं प्रतीक आहेत, असे शब्द श्री. पवार यांनी उच्चारले आणि उपस्थितांच्या मनामनात गर्वाची ज्वाला चेतवली.
या भावपूर्ण क्षणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याएम्ब्रॉयडरी सही असलेली ‘नेक टाय’, स्वाक्षरी इम्प्रिंट असलेला फाउंटन पेन, संविधानाची उद्देशिका, बाबासाहेबांच्या जीवनसंग्रामाची हृदयस्पर्शी टिपणे असलेली विशेष डायरी ही चार मूल्याधारित भेटवस्तू मा. पवार यांनी सप्रेम भेट म्हणून दिल्या.
आयपीएस बिरदेव डोणे यांनी त्या अत्यंत आदराने स्वीकारत आपली भावना अशा शब्दांत व्यक्त केली: “ही टाय माझं फॅशन स्टेटमेंट नसून, ती परिधान करून मी जेव्हा व्यासपीठावर उभा असताना त्यामागे एका महामानवाचं स्वप्न आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मी कटिबद्ध आहे, आणि त्या उत्तरदायित्वाचं भान मला या टायमधून सतत जागवेल.”तसेच त्यांनी बाबासाहेबांच्या सही असलेल्या पेनबाबत सांगितले: “हा पेन म्हणजे केवळ लेखनसाधन नव्हे, तर हा एक ‘मूल्यविचारांचा प्रहरी’ आहे. मी जेव्हा याच पेनातून एखादा आदेश, निर्णय वा कायदेशीर प्रक्रिया लिहीन, तेव्हा प्रत्येक शाईच्या थेंबात संविधान असेल आणि हा पेन केवळ सत्य व न्यायाच्या बाजूनेच चालेल, ही माझी स्वतःशी केलेली शपथ आहे.”
या अत्यंत प्रेरणादायी क्षणी बिरदेव डोणे यांची मातोश्री सौ. बाळाबाई सिद्धाप्पा डोणे, ज्यांना उपस्थितांनी ‘साक्षात अहिल्यादेवीचं रूप’ म्हटलं, तसेच त्यांचे मार्गदर्शक बंधू श्री. वासुदेव डोणे आणि दयाळू, मूक समर्थक म्हणून साथ देणारे श्री. चंद्रकांत पुजारी उपस्थित होते.
ही घटना केवळ एका अधिकाऱ्याच्या सत्कारापुरती मर्यादित राहिलेली नसून, भारतीय संविधान, बाबासाहेबांच्या विचारांची जिवंतता आणि नवभारताच्या आशावादी स्वप्नांचा जागर करणारा क्षण बनून काळाच्या स्मरणात कोरला गेला.

