Thursday, February 26, 2026
Homeमराठवाडाजलीलला अटक करा; जनआक्रोश मोर्चा चार दिवसांनंतर तीव्र आंदोलन.मोर्चात हजारो आंबेडकरी अनुयायांचा...

जलीलला अटक करा; जनआक्रोश मोर्चा चार दिवसांनंतर तीव्र आंदोलन.मोर्चात हजारो आंबेडकरी अनुयायांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) : माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाच्या विरोधात कथित आक्षेपार्ह शब्दप्रयोग करून ‘हरिजन’ हा अवमानकारक उल्लेख केला असल्याने त्यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक न झाल्याने संतप्त दलित समाजाने सोमवारी शहरात भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढत पोलिसांना चार दिवसांची मुदत दिली आहे.या मोर्चाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. मोर्चाची सुरुवात क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. सुरुवातीपासूनच हजारोच्या संख्येने बौद्ध अनुयायी मोर्चात सामील होत होते. हातात निळे झेंडे, फलक, “इम्तियाज जलील यांना अटक करा”, “बौद्धांचा अवमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणांनी शहराचे वातावरण ढवळून निघाले होते.या ठिकाणी रिपाईचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, अरुण बोर्डे, जालिंदर शेंडगे, अमित भुईंगळ, सतीश पटेकर, विजय जोंधळे, अफसर खान, संजय ठोकळ, बाळासाहेब सानप यांची भाषण करत इम्तियाज जलील यांच्यावर टीकेची झोड उठवली. “ज्यांच्या पाठिंब्यावर खासदार झाले, त्याच समाजाचा ते अपमान करत आहेत,” अशी भावना वक्त्यांनी मांडली.

शहर दणाणले; पावसातही मोर्चेकऱ्यांचा उत्साह कायममोर्चा क्रांती चौकातून सुरु होऊन गुलमंडी, औरंगपुरा मार्गे भडकल गेटकडे मार्गक्रमण करत होता. मोर्चाचे एका टोकाचे दृश्य क्रांती चौकात असताना दुसरे टोक गुलमंडी परिसरात होते. रिमझिम पावसाने मोर्चेकऱ्यांची तजवीज थोडीशी अडथळलेली असली तरी उत्साह तसूभरही कमी झाला नाही. भडकल गेट येथे उभारण्यात आलेल्या स्टेजवर झालेल्या सभेत विविध दलित नेत्यांनी जलील यांच्यावर कठोर टीका करत, त्यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

शहरभरून हजारोंचा प्रतिसाद, पोलिसांचा कडक बंदोबस्त मोर्चात शहरातील सर्व दलित वसाहतींबरोबर जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल झाले होते. विविध वाहनांमधून आलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी पार्किंग आणि पाण्याची योग्य व्यवस्था कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती. मोर्चा शिस्तबद्धपणे पार पडल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. दोन रुग्णवाहिका मार्गावर आल्यावर मोर्चेकऱ्यांनी त्यांना वाट करून देत शिस्तीचे उदाहरण घालून दिले.

महिलांची संख्या अधिक मोर्चामध्ये महिला, तरुणांची संख्या लक्षणीय होती. सकाळी दहापासून क्रांती चौकात जत्थेच्या जत्थे जमा होत होते. जवळपास दोन तास घोषणाबाजी झाल्यानंतर दुपारी १.३० च्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. ‘एकजुटीने लढा देऊ, इम्तियाज जलील यांना अटक करा, तडीपार करा’ अशा मागण्यांचे फलक आंदोलनकर्त्यांनी हातात घेतले होते. मोर्चाचे पहिले टोक सिल्लेखाना चौकाच्या पुढे, तर शेवटचे टोक क्रांती चौकात होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments