*मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमेंतर्गत कृती आराखडयानुसार क्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करुन उत्तम कामगिरी केलेल्या कार्यालयांची सूची जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये महानगरपालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेस तृतीय क्रमांकाचे मानांकन जाहीर झालेले आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या 6 महानगरपालिकांचे मूल्यमापन क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या मान्यताप्राप्त त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आले होते.*
*कृती आराखडयाच्या कार्यक्रमातील वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध 10 मुद्यांवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये कार्यालयीन स्वच्छता, नीटनेटकेपणा यापासून नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवांमधील सुलभता अशा सर्वच बार्बींवर लक्षणीय काम करण्यात आले.*
यामध्ये महानगरपालिकेचे संकेतस्थळ नुतनीकरण करुन ते वापरण्यास अधिक सुलभ व माहितीने परिपूर्ण करण्यावर भर देण्यात आला. जीआयजीडब्ल्यू अनुरुप संकेतस्थळ दिव्यांग स्नेही करण्यासोबतच त्यावर अत्यंत अद्ययावत अशी एआय चॅटबोट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत 68 पैकी 68 सेवा अधिसूचित करण्यात आल्या व नागरिकांच्या सुविधेसाठी त्या ऑनलाईनही उपलब्ध करुन देण्यात आल्या. नागरिकांना आपल्या घरी बसून मोबाईलच्या एका क्लीकवर या सेवा उपलब्ध करून घेण्याची सेवा देण्यात आली. या 68 लोकसेवांव्यतिरिक्त महानगरपालिकेशी संबंधित 41 आणखी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून त्यामधील 37 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
या मोहीमेंतर्गत 2766 जुन्या व निरपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली असून 106 निरुपयोगी वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे व त्यामधील 32 वाहनांचा लिलावही पूर्ण झाला आहे.
कार्यालयीन स्वच्छतेंतर्गंत 302369 अभिलेखाचे निंदणीकरण व वर्गीकरण करण्यात आले असून 50299 मुदतबाह्य अभिलेख नष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे दोन्ही अभिलेख कक्षांचे नुतनीकरण करण्यात आले.
नागरिकांना महानगरपालिका सेवांविषयी जाणविणा-या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी प्रभावी ‘तक्रार निवारण प्रणाली’ (Grievance Redressal System) कार्यान्वित करण्यात आली असून या अंतर्गत पीजी पोर्टल, आपले सरकार पोर्टल या शिवाय महानगरपालिकेने स्वत: चे माय एनएमएमसी पोर्टल व ॲप विकसित केला आहे. या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची तत्परतेने दखल घेण्यात येऊन त्याचे निराकरण करण्यात येत आहे व त्याबाबतची माहिती संबधित तक्रारदाराला कळविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांशी नियमित सुसंवाद राहत असून महानगरपालिकेची प्रतिमा उंचावण्यास याची मदत होत आहे. आयुक्तांसह महानगरपालिकेच्या सर्व अधिका-यांना भेटण्यासाठी दिवस व वेळा निश्चित करण्यात आल्या असून महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयुक्त महोदय यांच्याकडे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
नागरिक महानगरपालिकेच्या कार्यालयांना विविध कामांसाठी भेटी देत असतात. त्यामुळे या कार्यालयातील स्वच्छता व नीटनेटकेपणा याकडे कृती आराखडयाच्या कालावधीत विशेष लक्ष देत कार्यालयांमधील प्रतिक्षालयांचे नुतनीकरण करण्यात आले. त्याठिकाणी पुरेशा बैठक व्यवस्थेसह वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देत पुस्तकालय प्रस्थापित करण्यात आले आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, महिलांसाठी हिरकणी कक्ष, योग्य नामफलक अशा विविध बाबींची कार्यपूर्तता करण्यात आलेली आहे.
कार्यालयीन कामकाजामध्ये गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने ई ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यावर भर देण्यात येत आहे. अगदी नव्या युगातील एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याशी सुसंवाद ठेऊन त्यांच्यामार्फत लोककल्याणासाठी राबविण्यात येणा-या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात असून पीएम स्वनिधी, पीएम विश्वकर्मा, आयुष्मान भारत, जननी सुरक्षा, क्षयरोग नियंत्रण योजना / उपक्रमांमध्ये भरीव कामगिरी करण्यात आली आहे. नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम, 15 वा वित्त आयोगांतर्गत वायू, जल विषयक सुविधा कामे तसेच अमृत 2.0 अंतर्गत प्रकल्पांचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने सर्व दाखले ऑनलाईन प्रणालीव्दारे दिले जात असून शहर सुरक्षेकरिता सीसीटिव्हीचे जाळे टाकण्यात आले आहे. उच्च प्रतीचे रस्ते, शाश्वत पाणी पुरवठा, तात्काळ नळ जोडणी व मलनि:स्सारण जोडणी, सुसज्ज उद्याने व शाळा आणि अद्ययावत आरोग्य सेवा उपलब्ध आहे. व्यापारी व कामगार वर्गाच्या संघटनांशी चर्चा करुन गुंतवणुकदार उद्योजक, व्यावसायिक यांच्याशी चर्चा करुन एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय / उद्योग यांच्याकरिता आवश्यक परवाने / परवानग्या यासाठी प्रक्रिया सुलभ करुन ऑनलाईन परवाने उपलब्ध करुन दिले जात आहे.
कृती आराखड्यांतर्गत सुकर जीवनमानासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितांना नागरिक केंद्रीत सुविधांचे सुलभीकरण करण्यात आले असून मालमत्ता कर पध्दतीत कार्यालयीन प्रक्रियेतील नस्ती सादरीकरणाचे टप्पे कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कामाला गती आलेली आहे. मलामत्ता कराचे देयकही 6 महिन्यांऐवजी वार्षिक देयक वितरणावर भर देण्यात आला आहे.
अशाचप्रकारे नर्सींग होम परवानगीतील कार्यालयीन कामकाज टप्पे कमी करण्याचा आणखी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येऊन वेळेच्या बचतीसोबत कामकाजात पारदर्शकता वाढली आहे.
घनकचरा व्यवस्थापनात इंटिग्रेटेड कमांड नियंत्रण प्रणालीव्दारे कच-याचे प्रभावी वर्गीकरण साध्य होत असून कचरा संकलनावर वन क्लिक नियंत्रण राहत असल्याने यंत्रणांचे उत्तरदायित्व वाढून वेळ व पैशाची बचत होत आहे. याव्दारे कचरा वाहतूक वाहनांच्या मार्गांचे नियोजन करणे सुलभ झाले असून जिओ टॅगींगमुळे कचरा उचलला जाण्यावर नियंत्रण प्राप्त झाले आहे. आरएफआयडी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा व्यवस्थापनाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम अनेक दृष्टीनी किफायतशीर आहे.
कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणेकरिता वेब आणि मोबाईल आधारित डेटाबेस असणारे ‘एनएमएमसी दक्ष’ हे वेब व मोबाईल बेस ॲप्लीकेशन उद्याने, पाणी पुरवठा, सांडपाणी, रस्ते व वीज अशा विविध सुविधांवर गुणवत्तापूर्ण नजर ठेवणार आहे.
आणखी एक महत्वाचा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे टाकाऊ कपड्याची पुनर्निमिती करुन कच-यात जाणा-या वस्त्र कच-याचे प्रमाण कमी करणे व कच-यात जाणारी वस्त्रे नव्या स्वरुपात वापरासाठी नागरिकांन उपलब्ध करुन देणे असा असून अशा प्रकारचा प्रायोगिक प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिका राबवित आहे. याचे कौतुक पंतप्रधान महोदयांनी केले असून केंद्र सरकारच्या वस्त्रोदयोग मंत्रालयाच्या वस्त्र समितीमार्फत हा प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेसोबत राबविण्यात येत असून अशाप्रकारे कापडाचा पुनर्विकास करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.
*100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाची दखल राज्य पातळीवर तृतीय क्रमांकाने घेण्यात आली असून ही नवी मुंबईकर नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करीत यापुढील काळात अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख प्रशासनासाठी सतर्क राहून वाटचाल केली जाईल असे म्हटले आहे.*