_जरूरतमंदांना न्याय देण्यासाठी पत्रकार संघाचा पुढाकार; मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर_
आमगांव (ता.प्रतिनिधी) –महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संलग्न महाराष्ट्र पत्रकार संघ, तालुका आमगांव यांच्या वतीने दि.२ मे रोजी नगर परिषद आमगांव येथील मुख्याधिकाऱ्यांना घरकुल, रस्त्यांचे सिमेंटीकरण, नाल्यांचे बांधकाम व सार्वजनिक विहिरींच्या स्वच्छतेसाठी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष जितेन्द्र पटले, तालुका सचिव सचिन श्यामकुंवर, राज्य संपर्क प्रमुख भोला गुप्ता व गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष डी. के. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निवेदन सोपवण्यात आला.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आमगांव नगर परिषद हद्दीतील पाच हजारांहून अधिक गरजू नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र शासनाच्या ढिसाळ धोरणामुळे अद्याप अनेकांना मंजुरी मिळालेली नाही, आणि ज्या काहींना मंजुरी मिळाली आहे, त्यांना निधी अपुऱ्या प्रमाणात देण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने सर्व अर्जदारांना मंजुरी द्यावी आणि निधी वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच अनेक भागांत आजही मुरूम व खडीचे रस्ते असून पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी रस्त्यांचे सिमेंटिकरण करावे, तसेच नाल्यांची उभारणी न झाल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असून त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.निवेदनात पुढे सांगण्यात आले आहे की, अनेक सार्वजनिक विहिरी वर्षानुवर्षे साफ न केल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे विहिरींची सफाई व दुरुस्तीही तातडीने करण्यात यावी.यावेळी सुमित ठाकरे, नरेन्द्र निखारे,नरेश बोपचे,व्ही.डी. मेश्राम ,मनोज भालाधरे ,राकेश रामटेके, हेमंत शर्मा, राजेश मानकर, संजू खोटेले, सरोज कावळे, हरिहर पाथोडे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास पत्रकार संघ पुढील आंदोलनात्मक भूमिका घेईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

