मुकनायक मुंबई वृत्तसेवा
मुंबई,दि.१४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त, इंडिगो फ्लाइट 6E5181 वर एक आगळावेगळा क्षण अनुभवण्यात आला. समता सैनिक दलाचा गणवेश परिधान करून मुंबईहून इंदोरकडे प्रवास करणारे माजी सीमाशुल्क अधिकारी श्री. मदन पवार यांनी बाबासाहेबांच्या जन्मभूमी मिलिटरी कॅम्प, महू येथे अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली.इंदोर विमानतळावर पोहोचल्यावर इंडिगोच्या केबिन क्रूने त्यांच्या गणवेशाबद्दल कुतूहलाने चौकशी केली. त्यावर मदन पवार यांनी सांगितले की, “पूर्वी मी कस्टम अधिकारी होतो, आता मी समता सैनिक दलाचा एक सक्रिय सैनिक म्हणून बाबासाहेबांच्या मिशनमध्ये कार्यरत आहे. आज मी महू येथे अभिवादनासाठी आलो आहे.”ही माहिती कॅप्टन नम्रता व को-पायलट आलोक यांच्यापर्यंत पोहोचताच, दोघेही कॉकपिटमधून बाहेर आले आणि त्यांनी मदन पवार यांचे स्वागत केले. फ्लाईट कॅप्टन नम्रता म्हणाल्या, “डॉ. आंबेडकरांच्या मिशनमध्ये सहभागी असलेले प्रवासी आमच्या फ्लाइटमध्ये आहेत, हे आमच्यासाठी गौरवाचे क्षण आहेत. आम्ही बाबासाहेबांचा सन्मान मनापासून करतो.”या प्रसंगी मदन पवार यांनी कॅप्टन नम्रता आणि को-पायलट आलोक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेले ग्रीटिंग कार्ड दिले, ज्यावर त्यांचे प्रसिद्ध वाक्य लिहिले होते –“I am Indian, Firstly and Lastly.”दोघांनीही हे कार्ड सन्मानपूर्वक स्वीकारले व कॅप्टन नम्रता म्हणाल्या, “हे ग्रीटिंग आमच्यासाठी मौल्यवान आहे. आम्ही ते जपून ठेवू.”मदन पवार यांनी या भेटीत नम्रता यांना सांगितले, “तुमच्यासारखी महिला फ्लाईट कॅप्टन पाहताना, बाबासाहेबांनी उद्देशिकेत अधोरेखित केलेली ‘संधीची समानता’ साकार झालेली दिसते, हे पाहून अभिमान वाटतो.”इंडिगो फ्लाइट 6E5181 च्या केबिन क्रू व संपूर्ण टीमने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑन बोर्ड आदरांजली अर्पण करून सामाजिक जाणीव व संविधानिक मूल्यांचा आदर्श घालून दिला आहे त्याबद्दल इंडिगो एअरलाईन्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.

