मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे
कोल्हापूर, दि.03 : आत्तापर्यंत लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले व प्रलंबित अर्ज निर्गत करून नव्याने दाखल झालेल्या अर्जांवर तात्काळ उत्तरे द्या, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशही दिन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. या लोकशाही दिनादिवशी नव्याने 166 अर्ज दाखल झाले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अति. उपायुक्त राहुल रोकडे, उपजिल्हाधिकारी मुद्रांक विवेक वाघमोडे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.शिंदे म्हणाले, प्रत्येक विभागाने नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपल्याकडील प्रलंबित अर्जांवर पंधरा दिवसात निर्णय घ्यावे. प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी काही तास देवून त्यावर काम करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने 100 दिवसांचा गतिमान शासन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारी तसेच अर्ज वेळेत पाहून त्यावर निर्णय देणे आवश्यक आहे. प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. आज झालेल्या लोकशाही दिनादिवशी शासकीय निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील एकुण 166 अर्ज नागरिकांनी सादर केले. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय 75,जिल्हा परिषद 36 व इतर विभाग 55 अशी संख्या होती.

