पिंपरी, ता. १६ : सात वर्षांनंतर खुनातील गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीची नुकतीच जामीनावर सुटका झाली. आपल्या भाईला सात वर्षानंतर भेटल्या नंतर त्याच्या साथीदारांनी एकच जल्लोष केला. भाई घरी आल्यानंतर फुलांची उधळण काय.. फटांक्यांची आतिषबाजी काय.. असे प्रकार करीत भाईचे जंगी स्वागत केले. भाई देखील भारावुन गेला. मात्र, साथीदारांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सोशल मिडीयावर भाईंचा हा जल्लोष व्हायरल झाला आणि पोलीसांनी सर्वांना पोलीसी खाक्या दाखवला. भाई सह प्रत्येकाच्या कानात ..मेरी आवाज सुनो.. चा आवाज.. गुणगुणू लागला.
शाम यत्नाळकर (रा. त्रिवेणीनगर, निगडी) असे जामीनावर सुटलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सातारा वाई येथील एका खुनाच्या गुन्ह्यात सातारा कारागृहात शिक्षा भोगत आहे. सात वर्षानंतर न्यायालयाने त्याचा नुकताच जामीन मंजुर करुन त्याची जामीनावर सुटका केली आहे.
आरोपी शाम यत्नाळकर याची जामीनावर सुटका झाल्यानंतर तो त्रिवेणीनगर, निगडी येथील त्याच्या घरी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आला. तो घरी आला आहे. अशी खबर त्याच्या साथीदारांना मिळाली आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आरोपीच्या साथीदारांनी उत्साहाच्या भरात त्याच्यावर फुलांची उधळण केली. नंतर फटाके वाजवुन त्याचे स्वागत केले आणि पोस्ट व्हायरल केली. त्यांच्या या कृत्यांने परीसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
थोड्या वेळात हि बातमी निगडी पोलीसांच्या कानावर गेली. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी तत्काळ तपास पथकाला योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
तपास पथकाने आरोपी शाम यत्नाळकर याच्यासह त्याच्या सर्व साथीदारांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात त्यांना योग्य ती समज देत पुन्हा अशी चुक आमच्याकडुन होणार नाही. आपण ही अशा प्रकारची चुक करु नका. अशा प्रकारचा संदेश या सर्वांनी व्हायरल केला आहे.
“ वाई येथील एका खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेला आरोपी शाम यत्नाळकर हा निगडी येथील त्याच्या घरी आला होता. तो घरी आल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या स्वागताच्या काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्या सर्वांना आम्ही योग्य ती समज दिली आहे. ”
शत्रुघ्न माळी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
निगडी पोलीस ठाणे

