Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडपिंपरी चिंचवड शहरात चाललयं तरी काय ? एकीकडे बिनधास्त गोळीबार ..तर दुसरीकडे...

पिंपरी चिंचवड शहरात चाललयं तरी काय ? एकीकडे बिनधास्त गोळीबार ..तर दुसरीकडे गुन्हेगाराचे जंगी स्वागत !

पिंपरी, ता. १४ : वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करीत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक येतात आणि खुलेआम गोळीबार करुन जातात. या गोळीबारात एकाचा मृत्यू होतो ..तर दुसरीकडे ७ वर्षानंतर जेल मधुन जामीनावर सुटलेल्या एका खुनातील आरोपीचे जंगी स्वागत केले जाते. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस कारवाई करीत असले तरीही अशा घटनांमुळे पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का ? परिणामी, पिंपरी चिंचवड शहरात नेमकं चाललयं तरी काय ? असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
देहुरोड मधील आंबेडकर नगर भागात राहणारे नंदकिशोर रामपवित्र यादव यांनी गुरुवार (ता.१३) रोजी भावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा कार्यक्रम संपवुन ते मित्र व नातेवाईक यांच्यासह त्यांच्या घरासमोर मंडपाबाहेर उभे असताना इसम शाबीर समीर शेख, फैजल शेख, जॉन उर्फ साई तेजा चित्तामल्ला आणि रजीया शेख हे तेथे आले. दरम्यान क्षुल्लक वादाचे रुपांतर भांडणात झाले. फैजल याने नंदकिशोर यादव यांना शिविगाळ करुन तेथील खुर्ची घेवुन मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी भाऊ राजकुमार यादव व मित्र विक्रम गुरुस्वामी रेडी हे आले असता जॉन, फैजल आणि रजिया यांनी त्यांना दगड फेकुन मारण्यास सुरवात केली. यामध्ये नंदकिशोर यादव जखमी झाले.
या भांडणा दरम्यान, शाबीर शेख याने स्वतःकडील पिस्टल मधुन विक्रम रेडी याच्यावर फायरींग केली. यामध्ये विक्रम रेडी याचा मृत्यू झाला. पोलीसांनी महिला आरोपी रजिया शेख हिला अटक केली आहे. मात्र, इतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सातारा येथील एका खुनाच्या गुन्ह्यात ७ वर्ष कारागृहात असलेला आरोपी शाम यत्नाळकर (रा. त्रिवेणीनगर, निगडी) याची नुकतीच जामीनावर सुटका झाली. तब्बल ७ वर्षानंतर भाई निगडीतील घरी परत आल्यानंतर त्याच्या साथीदारांनी एकच जल्लोष केला. त्याच्यावर फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत त्याचे जोरदार स्वागत केले.
या सर्व प्रकारामुळे आजुबाजुच्या परीसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. निगडी पोलीसांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असुन त्याच्या इतर साथीदारांची झाडाझडती सुरु केली आहे.
अजित दादांची गर्जना..
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारत भूमीपूजन समारंभ कार्यक्रम (ता.६) रोजी जाधववाडी (चिखली) येथे पार पडला. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीसांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. पुण्यातील बिबवेवाडी परीसरात झालेल्या वाहन तोडफोड करणाचा मुद्दा उपस्थित करीत असे प्रकार करणाऱ्यांची सरेआम धींड काढण्याचे आदेशच अजित दादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना दिले.
पुण्यासारखे वाहन तोडफोडी चे प्रकार पिंपरी चिंचवड शहरात खपवुन घेतले जाणार नाहीत. अशी तंबी देखील त्यांनी दोन्ही पोलीस आयुक्तांना दिली. मात्र, दोन दिवसानंतर चिखली परीसरात १७ ते १८ वाहनांची तोडफोड एका अल्पवयीन मुलाने केल्याची घटना घडली. हा तोडफोड करणारा अल्पवयीन होता. म्हणुन थोडक्यात बचावला. मात्र, पोलीसांनी त्याच्यावर योग्य कारवाई केली आहे. अन्यथा दादांच्या आदेशानुसार पोलीसांनी त्याची चांगलीच धींड काढली असती.
पोलीसांची गस्त वाढवावी
देहुरोड, चिखली, पिंपरी, निगडी हा संवेदनशील भाग आहे. या भागात गुन्हेगारी टोळ्या अधिक आहेत. टोळी म्होरक्यांचा बंदोबस्त पोलीसांनी केला असला तरी त्यांच्या जीवावर उड्या मारणारी पिलावळ चौका-चौकात थांबलेली दिसुन येते. पोलीसांनी गस्त वाढविल्यास चौकातील हि पिलावळ नक्की कमी झालेली दिसुन येईल. गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments