तुमच्या विचार करण्यावर कुणाची तरी ताबेदारी असू शकते काय ? ती असू शकते ! संघपरिवार यावर भारी गृहपाठ (home work) करतोय. ही मानसिक ताबेदारी पूढे मानसिक सत्तेकडे व तशीच प्रत्यक्ष सत्तेकडे वळती होतेय. या देशातील लोकांनी कसा विचार करावा वा करू नये हे यातून ठरविले जाते. आपल्या भूमिकेला साजेसे वा पूरक असेल ही काळजी तयात असते. प्रचंड लोकसंख्या आणि मतदान घेणारी लोकशाही याला ही मानसिक ताबेदारी प्रत्यक्ष सत्ताप्राप्तीला मदतीची ठरते. संघपरिवार यात निष्णात झालाय. ही मानसिक ताबेदारी म्हणजे काय ? एका छोट्या उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल. शारीरिक व्यंग वेधणारा ‘अपंग’ हा शब्द वापरात होता. सरकार दरबारीही मान्य होता. हा अपंग शब्द वापरात नको अशी कुणीही मागणी केली नाही. तशी चर्चा सुध्दा नव्हती. पण संघपरिवाराला अपंग शब्द नको होता. त्यांना अपंग ऐवजी ‘दिव्यांग’ शब्द हवा होता. तो वापरात आणल्या गेला. दिव्यांग रुजला. अपंग बाद झाला. कायम विस्मरणात गेला. अप्रत्यक्ष ताबेदारी ही अशी असते. हीच मानसिक ताबेदारी ! स्मरण आणि विस्मरण दोन्हींना प्रभावात ठेवणे. काय लक्षात ठेवायचे व काय विसरायचे हेही असे निसटले जाते. राजकारणात हे अंग खूप प्रभावी आहे. वाईट याचे की हे अजून लोकअभ्यासात नाही. शिवाय दुर्लक्षित आहे. ही एक प्रकारची मानसिक पेरणी असते. सर्व प्रकारची माध्यमे इथे वापरली जातात. कोणते पेरायचे ? कसे पेरायचे ? कोणता पेरा घ्यायचा ? सारे ठरवून असते. ही नव्या व्यूहरचनेची अभिन्नता झालेली आहे. अलीकडेच हिंदू धर्म ऐवजी सनातन धर्म केले गेले. तिथे हेतू आहेच ! नुकतेच वाचनात आले, कुंभमेळातील शाही सवारी/शाही स्नान हे शब्द संघपरिवाराला नकोत. ते इस्लामिक असल्याचे सांगितले जाते. राजसी स्नान, देवत्व स्नान, अमृत स्नान या पर्यायावर विचार सुरू आहे. मधल्या काळात महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू झाली. त्याचकाळात देवेंद्र चे देवाभाऊ असे नामकरण झाले. ‘टाईमिंग’ अशी साधली जाते. हे केवळ शब्दांचे नसते. घेतलेल्या राजकीय भूमिकेशी संलग्न वा पूरक मानसिकता घडण्याचे/घडविण्याचे ते असते. अनेक पातळ्यांवर ते सुरु असते. त्याचे परिणाम नंतर दिसत असतात.एकदा ही बाब लक्षात आली की संघ बारकावेही लक्षात येतील. अनेक घटनांना, प्रसंगांना समजणे सोपे जाईल. मानसिक बळीही कमी होत जातील. पण हे जरतर वर आहे. ईडी वगैरे स्वायत्त संस्थांची ताबेदारी लक्षात येऊन जाते. तशी हीही येईल.अलीकडे पाचशे-हजारचे सभागृह भरण्याला ‘क्रांतीची लाट’ समजले जाते. घोळ असा होतोय. भूमिका पाडावर, टपरीवर जायला हवी. ती सभागृहात असते. सभागृह बदलतात. श्रोते तेच असतात. संघाने मात्र, माणसांचे सर्व ठिय्ये नांगरले. ते जातीचे असो वा लाभाचे. जातीचे वर्गीकरण त्यातलेच. एक दुखावतो. एक सुखावतो. सुखावणारा हाताशी लागतो. तेच त्यांना हवेय. मतपेटीशी मतलब. भेगा करणे ही त्यांची जमेची बाजू आहे.संघ ब्राह्मणांचा आहेही ! भाजपा संघाची ! पण, भाजपा ओबीसींची असे खोटे चित्र उभे केले गेले. भूमिका नसली की हे सहजसाध्य असते.ओबीसीतील मोठ्या जातघटकांत भाजपने सढळ हाताने तिकिटे वाटली. डाव होताच ! परिणाम घडणे स्वाभाविक होते. नुकतेच, अपत्ये जन्माला घाला असा फतवा सरसंघचालकांनी काढला. किमान दोन-तीन मुले असावीत हा त्यांचा आग्रह आहे. प्रजनन दर घटला की समाज नष्ट होतो अशी त्यांना चिंता आहे. खरेतर हे म्हणणे सुध्दा ठरवून असावे. गेले काही दिवसांपासून संघपरिवारातून एक नॅरेटिव्ह मांडले जाते. मुस्लिम लोकसंख्या वाढतेय. हिंदूंचे प्रमाण घटतेय. या भाकितांना कोणतेही तथ्य नसल्याचे ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने सप्रमाण सिद्ध केले आहे. तरीही संघपरिवार थांबत नाही. जोडीला आता ‘लोकसंख्या लाभांश’ ही ‘थिअरी’ मांडणे सुरू झाले. वाढती लोकसंख्या हा बोजा नसून समृध्दीचे ठरु शकते. वाढती लोकसंख्या ही संघपरिवाराला सत्तेची शिडी असल्याचे वाटते. हिंदुत्वात असे सारे गुंडाळले गेले. हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व. भारतीयत्व म्हणजे राजकीयत्व.त्यात ते सुसाट आहेत. त्याला पोषक ते करतात. नवनवे त्यांना सूचत असते. गाय राज्यमाता होऊन जाते. राज्यरोहणात साधूसंत येतात. सध्या सत्ताधुंदीत आहेत.इथेच संघपरिवार गाफील वाटतो. त्यांचे ‘केंद्रस्थानी’ ‘हिंदू’ आहे.त्यांचे ‘केंद्रस्थानी’ ‘माणूस’ आहे का ? माणसाचे सुख तर नाहीच ! माणसाचे सुख लहानसहान बाब नाही. जगात या मुद्यावर ‘क्रांती’ झाल्या आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही.लग्ने होत नाहीत.बेकारीचा उच्चांक. गरीबीचा निच्चांक.९० टक्के लोक निर्णयप्रक्रियेत नाहीत.सारा पट समोर आहे.राजकीय लढाई छेडून द्यावी. ती मानसिकता देश हलवून टाकेल !
रणजित मेश्राम 👤

