Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरअत्त दीप भव’ बोधवाक्याबद्दल कुलगुरूंचे कृतज्ञता पत्र देऊन अभिनंदन

अत्त दीप भव’ बोधवाक्याबद्दल कुलगुरूंचे कृतज्ञता पत्र देऊन अभिनंदन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा विद्यापीठाचा समाज मनातून गौरव!

मुकनायक प्रतिनिधी – राहुल कांबळे

कोल्हापूर : २७ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसारित करून स्थापन केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाने आपल्या विद्यापीठाचे सुंदर असे बोध चिन्ह तयार केले असून हे बोधचिन्ह सर्वसमावेशक आणि रयत शिक्षण संस्थेच्या विचार धारेला धरून आहे. शांत अशा निळ्या रंगातील पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो आणि रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष यांचा समावेश बोधचिन्हात केला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या ‘स्वावलंबी शिक्षण’ या बोधवाक्याशी सुसंगत असे बोधवाक्य ‘अत्त दीप भव’ हे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे बोधवाक्य म्हणून नियामक मंडळाने मान्य करून हे बोधचिन्ह आता कर्मवीर विद्यापीठाच्या वेबसाईटवर देखील प्रसारित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेला सम्यक संदेश ‘अत्त दीप भव’ यास विद्यापीठाने बोधवाक्य म्हणून मान्यता दिल्याने समाजातील सर्वांकडून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्यापीठाने वैश्विक पातळीवर विवेकी विचारवंत असलेल्या गौतम बुद्धांचे पाली भाषेतील ‘अत्त दीप भव’ बोधवाक्य निवडून आणि स्वीकारून वैज्ञानिकता , तर्क सुसंगतता ,विवेक ,स्वावलंबन , समता , सम्यक विचार व कृती ,आत्मनिर्भरता ,बंधुता ,स्वातंत्र्य ,न्याय इत्यादी मूल्याना महत्व दिलेले आहे.

भारतात ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य कोणत्याही विद्यापीठाचे नाही.बहुतांशी विद्यापीठांची बोधवाक्ये ही संस्कृत भाषेतील असून त्यांचे उच्चारण करणे आणि त्याचा अर्थ समजून घेणे हे अवघड जाते . या पार्श्वभूमीवर गौतम बुद्धांच्या काळात पाली ही बहुजन समाजाची भाषा होती. गौतम बुद्धांनी याच भाषेत लोकांना आपला धम्म समजावून सांगितला. बहुजन हिताय ,बहुजन सुखाय हा विचार गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीत येतो. ‘अत्त दीप भव ‘ हे बोधवाक्य विद्यापीठाने स्वीकारल्याचे समाज माध्यमात वाचून मदन पवार स्टडी अंड रिसर्च सेंटर , नवी मुंबई चे प्रमुख मदन पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा चे नूतन कुलगुरू प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के व कुलसचिव डॉ.विजय कुंभार यांची समक्ष भेट घेऊन कृतज्ञता पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले . कृतज्ञता पत्रात त्यांनी लिहिले आहे की’ अत्त दीप भव हे बोधवाक्य कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या बोध चिन्हामध्ये अत्यंत सुसंगत ,संयुक्तिक ,प्रभावशाली आणि प्रेरणादायक आहे.’ स्वयंप्रकाशित व्हा’ अर्थाचे हे बोधवाक्य विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी प्रेरित करते .आत्मनिर्भरतेचा संदेश देते. ‘अत्त दीप भव ‘ या बोधवाक्याच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या जीवनातील आव्हानाना सामोरे जाण्यासाठी मोठ्या आत्मविश्वासाने तयार होतील. अडीच हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांचा समस्त मानव जातीस दिलेला हा संदेश कर्मवीर भाऊराव अण्णा यांनी तंतोतंत अनुसरला. आपली शिक्षण संस्था त्याचे जीवन ,शैक्षणिक ,सामाजिक कार्यसुद्धा ‘अत्त दीप भव’ या संदेशाचे जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहे. आपले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हाच संदेश आजच्या पिढीला देत आहे हे खूप कौतुकास्पद आहे.’ अशी कृतज्ञता व्यक्त करीत विद्यापीठाचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी कुलगुरू प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी पवार यांचे आभार मानून या बोधवाक्याचे महत्व सांगितले . ते म्हणाले की हे कृतज्ञता पत्र खूप मौलिक आहे कारण यामध्ये सर्वसामान्य समाजाच्या भावनेचे प्रतिबिंब आहे त्यामुळे हे पत्र विद्यापीठाच्या अभिलेखांमध्ये कायमस्वरूपी जतन करण्यात येईल.

या बोधवाक्याबद्दल अनेक विचारवंत , सामाजिक संघटना यांचेकडून गौरव केला जात आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments