Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्र*डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकरणी जनतेची दिशाभूल : अमोल वेटम*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकरणी जनतेची दिशाभूल : अमोल वेटम*

*वार्ड क्रमांक ८ मनपा खुल्या भूखंडावरील मंजूर ठराव ऐनवेळी रद्द का* ?

सांगली दि.२७ : सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्रमांक ८ मधील स.नं. १० (क्षेत्र २४.६१ आर ) या मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने स्मारक उभारून सुसज्ज वाचनालय निर्माण करण्यासाठी महासभा दिनांक १४ जून २०१९ रोजी महासभा ठराव क्रमांक ४३, दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी महासभा ठराव क्रमांक ४६ अन्वये मंजुरी देण्यात आली होती.

या ठिकाणी सुसज्ज वाचनालय, उद्यान विकसित करणेकामी नकाशा, आराखडा व अंदाजपत्रक तयार करणेसाठी वास्तुविशारद एस.पी.तायवडे-पाटील यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली होती .यानंतर या प्रभागातील संबंधित नगरसेवक यांनी याठिकाणी बुद्ध पौर्णिमादिनी उद्घाटन करून कोट्यावधी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वसन दिले होते. याकामी शासन हिस्सा ९० टक्के तर १० टक्के मनपा स्वहिस्सा भरण्यास तयार असल्याचे व सदर जागेची जबाबदारी मनपा स्वीकारत असल्याचे बंधपत्र शासनास सादर करण्यास मान्यता देखील महासभेने दिलेली आहे. गेले चार वर्ष याठिकाणी कोणताही विकास या ठिकाणी मनपा तसेच नगरसेवकांनी केले नाही.

असे असताना दिनांक २० जून २०२३ रोजी ऐनवेळी महासभा ठराव क्रमांक ५६१ मांडून तांत्रिक अडचणींचे अवास्तविक कारण पुढे करून वरील दोन्ही मंजूर असलेला ठराव ऐनवेळी रद्द करून घेण्यात आला यावर सूचक नगरसेवक राजेंद्र कुंभार, अनुमोदक नगरसेविका सोनाली सागरे म्हणून यांच्या सह्या आहेत. केवळ नागरिकांची, आंबेडकर समूहाची दिशाभूल करण्यात आली. या भूखंडावर कोणाचा डोळा आहे याची चौकशी देखील करण्यात यावी.

वरील प्रकाराची मनपा आयुक्त यांनी तत्काळ चौकशी करून सदर नियोजित ठिकाणी कामकाज तत्काळ सुरु करावे, जागेची मोजणी करावी, आराखडा तयार करावा अन्यथा मनपा कार्यालय समोर विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने येत्या सात दिवसात आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोल वेटम, दिनेश साबळे, संतोष सरोदे, प्रमोद कांबळे यांनी दिला .

- Advertisment -

Most Popular

Recent Comments