आज “स्त्री मुक्ती दिन. “भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले” यांची आज जयंती१९०वी जयंती. सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा प्रारंभ झाला. आज सावित्रीच्या लेकी सर्वत्र जगात आघाडीवर आहेत. याची सुरुवात सावित्रीबाईंमुळे झालेली आहे.
सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्यातच आमूलाग्र बदल केले नाही तर इतर कार्यातही मोठया हिरीरीने पुढाकार घेतला. केशवपन, बालविवाह विधवाविवाह, सती चाल यादी कार्यात त्यांनी सिंहाचा वाटा बजावला. बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केल्यावर त्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे सर्वर बालकांची सेवा केली, स्वतःला बोचणारे अपत्यहीनपणाचे दुःख पळवून लावण्यासाठी त्यांनी यशवंत नावाच्या मुलास दत्तकही घेतले त्यांच्या या मानवतावादी कार्याबददल सुधारक लोकांनी तोंडभरून स्तूती केली.
सामाजिक क्रांतीची अग्रदूत लोकमाता सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतल्यास त्या प्रतिभाशाली कवयित्री, प्रभावशाली शिक्षिका, निस्वार्थी व धडाडीच्या समाजसेविका, स्त्री-पुरुष समानतेच्या प्रणेत्या होत्या तसेच स्त्री प्रतिष्ठा वाढविणा-या लोकनेत्याही होत्या. महात्मा फुलेंच्या विचारांची ज्योत तेवत ठेवणा-या पणती मवाल्यांसाठी कर्दनकाळ होत्या. त्या ख-या अर्थाने काळाची पावले ओळखणा-या एक दूरदृष्टी खंबीर, कर्तबगार लोकमाता होत्या. अशा या आदयक्रांतीचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिहयातील खंडछाळा तालुक्यातील नायगांव येथे झाला. तो काळ म्हणजे एकोणिसावे शतक पेशव्यांच्या काळात स्त्री आणि शुद्र यांना पशुपेक्षाही करूण आणि दारुण वागणूक देणारा काळ. स्त्री म्हणजे नरकद्वार, स्त्री अशा या महाभयंकर काळात कुणीतरी समाजाला दिशा देणारा, मायेची ऊब देऊन योग्य वाटेने चालते करणारा जन्माला यावा लागतो. त्याचा भाग म्हणून सावित्रींनी जन्म घेतला. त्या जन्मत:च सौदामिनीप्रमाणे तेजस्वी व सुंदर कन्या होत्या चरित्र नायिका युगस्त्री, क्रांतीज्योती होत्या.
सावित्रीबाईंनी ज्ञानदानाचे कार्य यशस्वीपणे पार पाडून देशापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. त्यामुळे त्यांचे ज्ञानदानातील अविश्रांत परिश्रम लक्षात घेऊन मेजर कॅडी, रे. रीव्हन इत्यादी तत्कालीन इंग्रज अधिका-यांनी सावित्रीबाई शिक्षणप्रसाराच्या कार्यामुळे जोतिराव आणि सावित्रीबाई फुले कार्याची नोंद घेऊन १६ नाव्हेंबर १८५२ रोजी उभय पतीपत्नीचा सत्कार केला. या सत्कार समारंभाला मिसेस मिचेल, ढमढेरे, प्रा. छत्रे, बापुराव मांडे आदी मान्यवर जातीने हजर होते. महिलांनी अंधश्रध्दांच्या व जुनाट गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न करून महिला सेवामंडळाची स्थापना केली. त्याव्दारे स्त्री जागृतीसाठी सर्वांगीण्एा प्रयत्नांची पराकाष्टा करून स्त्री मुक्ती आंदोलन उभारले. दीनदलीतांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होणारे हाल पाहून स्वतःच्या घरचा हौद खुला केला. इ.स. १८७६-७७ च्या दुष्काळात फुले दांपत्यानी मिळेल तिथून अत्र जमवून ५२ अत्र छत्रालये चालविली. त्यात बारा वर्षाच्या आतील दोन हजार बालकांना अन्न मिळू लागले. यावरून त्यांच्या मनाची महती, हृदयाचा, दिलदारपणा व लोकहितवादाची तयारी लक्षात येते. दीन दुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय असे त्या म्हणत असत.
हिंदुधर्मातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पिढीजात अनिष्ठ रुढी परंपरेविरुद्ध अफाट धर्मांध शक्तीच्या विरोधात ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून, त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जातीभेदाच्या व धर्मरुढीच्या बेडया तोडून, समदु:खी स्त्रियांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता करण्यासाठी रणमैदानी उतरल्या. हालअपेष्टा, यातना सहन करुन व अपमानाची पर्वा न करता बहुजन समाजाची विशेषत: सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांची निस्वार्थपणे अविरत सेवा करण्यासाठी मोठया धैर्याने पुरुषासारखा संघर्ष करावा लागला. स्त्री उद्धाराकरीता संपूर्ण आयुष्य चंदानसारखे झिजून बहुजन स्त्रियांची कायमचीच मुक्तता केली. स्त्री व पुरुषांवर क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी अनंत उपकार करुन ठेवले आहेत. त्यांच्या या प्रभावी प्रेरणेने जीवनमान प्रकाशमय झाले असून, स्त्रियांना भक्कम पाठबळ प्राप्त होऊन एकप्रकारची चालना मिळाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या कार्यामुळेच आज स्त्री ही स्त्री स्वातंत्र्याच्या हक्कासाठी पुरुषांना आव्हान करीत मोठया हिम्मतीने बंड करण्यास पुढे येऊ लागली आहे.
सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर आपणास असे दिसून येईल की, पेशवाईच्या काळात मनुस्मृतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर पूर्णत: बंदी होती. त्यांना कुठलेच अधिकार नव्हते. शूद्रातिशूद्र सोडून बाकी पुरुषांनाच सर्वाधिकार होते. स्त्रियांना पुरुषांची एक उपभोग वस्तू म्हणून बघितले जात होते. बालविवाह, पतीच्या मृत्युनंतर केशवपन, सती जाणे, पुनर्विवाहास(स्¬त्रियांच्या) बंदी, त्यांच्याशी व्याभिचार, शिक्षणास बंदी, अंधश्रद्धा, अज्ञान इत्यादी अत्याचार, हिंदुधर्माच्या नावाखाली या अनिष्ट चालीरिती सर्रास राजरोसपणे सुरु होता. त्यांनी आधारगृहे सुद्धा चालविली. स्त्रियांचे जीवन अगदी अंधारमय करुन, गुलामापेक्षाही वाईट वागणूक देऊन, अत्याचाराच्या खोल दरीत लोटून उद्धवस्त केले जायचे. या विरोधात त्या शेवटपर्यंत लढल्या.
क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षीच ज्योतिबा फुलेंशी १८४० मध्ये झाला. त्यावेळी ज्योतिबा फुलेंचे वय १३ वर्षांचे होते. समविचारांच्या व्यक्ती एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात परिवर्तनाचा पाया घालणाऱ्या व्यक्तीपैकी पहिले युगपुरुष खऱ्या अर्थाने ठरले.
क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले या खऱ्या अर्थाने स्त्री उद्धारक, स्त्री मुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व समतावादी असे मोठया अभिमानाने म्हटले जाते. त्यांनी केलेल्या योगदानामुळेच सर्व स्त्रियांचा विकास झालेला आहे व आजही होत आहे. म्हणून आजची स्त्री ही समाजापुढे जाती धर्माच्या भिंतीला हादरे देऊन, ताठमानेने उभी राहून पुरुषांशी सुद्धा स्पर्धा करु लागली आहे आणि स्त्रियांच्या अनेक संघटना उभारुन अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढे उभारण्याचे व चळवळी चालवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत आहेत. अशा या स्त्रीमुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री उद्धारक, समतावादी समाज सुधारक व युगस्त्री क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले यांनी बहुजन समाजाला योग्य दिशा देऊन साऱ्या समाजाला आयुष्यभर प्रकाश देऊन सर्वांचे जीवन प्रकाशित केले. आयुष्यभर धडपडणाऱ्या आणि सातत्याने संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्लेग या आजाराने १० मार्च १८९७ साली क्रांतिज्योत कायमचीच विझली. त्यांच्या या जयंतीदिनी व जागतिक स्त्रीमुक्ती दिनानिमित्त त्यांच्या क्रांतीकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम !!
— प्रणय सोहमप्रभा ,नागपूर

