*मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो!!!. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया!!! हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात.याच गोष्टींचा फायदा घेत आजकाल निवडणुकांमध्ये अनेकदा अनेक पक्ष गुन्हेगारी प्रतिमेच्या उमेदवारांना तिकीट देतात, त्यांच्यावर बलात्कार किंवा खुनाचा आरोप असला तरी कधी-कधी असे लोक निवडून आणून संसद भवनापर्यंत पोहोचतात, आता प्रश्न पडतो की त्यांना जिंकण्याचे श्रेय कोणाला द्यावे? ज्यांनी मतदान केले किंवा ज्यांनी मतदान केले नाही त्यांचा विचार करण्याची गरज आहे.आणि नंतर आपणच त्यांच्या नावावर बोंबा मारतो कि ह्या राजकारणी लोकांनी देशाची वाट लावली . काय अधिकार आहे आपल्याला असं म्हणण्याचा . सुदृढ लोकशाहीच्या उभारणीचा पाया हा फक्त आणि फक्त मताधिकार असतो, त्यामुळे इमारत भक्कम व्हायची असेल तर तिचा पायाही भक्कम असायला हवा, मतदानाचा अधिकार हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचा योग्य वापर करा.*
दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाची घसरणारी टक्केवारी लक्षात घेऊन भारत सरकारने सन २०११ पासून भारत सरकारने निवडणूक आयोगाचा स्थापना दिन २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. देशाच्या राजकीय प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व मतदारांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी शासनाकडून व विविध सामाजिक संस्थांकडून या दिवशी मतदार जनजागृती साठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
देशात मतदानाच्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची पद्धत आहे . त्यातल्या त्यात लोकांच्या मनात मतदानाविषयी उदासीनता असल्यामुळे ह्या सुट्टीचा फायदा ते सहकुटुंब सहलीला जाण्याकरिता उपयोगात आणतात. सहलीचा आनंद लुटण्यास मनाई नाही परंतु तुम्ही मतदान करून कुठेही जा . घटनेने दिलेल्या अधिकाराचा त्यांना अर्थ कळलेला नाही. यांच्यात मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गिय सुशिक्षित मंडळींचा सहभाग जास्त आहे. एका विचारवंताने म्हटलेले आहे की ,”चांगले लोक मतदान करीत नाही ,म्हणून वाईट लोक निवडून येतात.” हे म्हणणे काही अंशी खरे पण आहे.भारताच्या संसदेमध्ये गुन्हेगार लोकांचा भरणा जास्त झालेला आहे असं नेहमी जे लोक म्हणतात तेच लोक मतदान करीत नाही.आज शहरी क्षेत्रामध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त असले तरी त्यांच्या उदासिनतेमुळे मतदानाचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येते . निवडणूक आयोगाकडून किंवा सरकार कडून हे प्रमाण वाढविण्यासाठी शहरी क्षेत्रात मतदान कमी होण्याची नेमकी कारणे शोधून काढून त्यासंबंधी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरी भागात दूरदर्शन, सिनेमागृहे, केबल टिव्ही इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. वेबसाईट व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
वंचित समाज/समुह यांची मतदार नोंदणी वाढावी आणि मतदानामध्ये त्यांचा सहभाग वाढावा,यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. नाशिकमध्ये सेनादलातील अधिकारी / कर्मचारी, सोलापूरमध्ये बीडी कामगार, बीडमध्ये ऊसतोड कामगार, गडचिरोलीमध्ये माडिया हा आदिवासी समूह तर ठाणे जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी यांचे मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचे असलेले आढळून आलेले आहेत. ह्या लोकांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेण्याकरिता त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे आवश्यक आहे. मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये या समाजाकडे विशिष्टपणे व्यक्तीश: लक्ष दिले जात आहे.
देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे खरे प्रतिनिधित्व देशापुढे येईल. कारण अनेकांनी मतदान न केल्यामुळे त्यांचा देशाला मिळालेला प्रतीनिधित्वाबद्दलचा कल लक्षातच येत नाही. त्याचप्रमाणे मतदारांचे केवळ एक मत सुद्धा प्रतिनिधित्व बदलू शकते. म्हणून देशाचा कारभार सांभाळणारे प्रतिनिधित्व निवडतांना योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी भारतातील प्रत्येक मतदाराने मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे निकडीचे आहे. भारतीय संविधानाने मतदारांना दिलेला मतदानाचा हक्क खुप अनमोल आहे.भारतीय संविधानाने मतदारांना दिलेला मतदानाचा हक्क खुप अनमोल आहे.यात गरीब-श्रीमंत ,उच-निच ,जात-पात ,स्त्री-पुरुष,काळा-गोरा असा कसलाही भेदभाव न करता प्रत्येकाला समान संधी दिलेली आहे.त्यामुळे आपल्या मतदानाचा हक्क सुज्ञपणे वापरून देशाला विकासाच्या मार्गावर वर घेऊन जाण्यासाठी आणि देशाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक मतदारांनी जागृत झाले पाहिजे. देशाच्या मतदारांच्या एकूण संख्येत तरुण वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तरुणांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिकाधिक सहभागी होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाहीच्या मूल्यांना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यातूनच भारताची लोकशाही अखंड राहील. मतदान प्रक्रियेत मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवणे, तसेच देशासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांना मतदानाबद्दल जागृत करणे हे राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्दिष्ट आहे. आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने देशातील प्रत्येक मतदाराने आपल्या सक्रीय सहभागाच्या आधारे व आपली सांविधानिक जबाबदारी पार पाडून लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न संकल्प केला पाहिजे. जेव्हा या देशातील प्रत्येक जण आपला मतदानाचा हक्क बजावेल आणि योग्य अशा उमेदवाराची निवड करेल त्या दिवशी ह्या देशाचा पंतप्रधान हा उच्चविभूषित असेल ,देशाचा अर्थमंत्री हा अर्थतज्ञ असेल. आज आपण आपला हक्क बजावत नाही त्यामुळे ह्या देशात दहशतवादीचा ठपका असलेले लोक संसदेत आहेत ,तडीपार लोक मंत्री आहेत हे आपल्याला मारक आहे. मी तर असेही म्हणेन की मतदानाचा हक्क याला घटनेत मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य ह्यामध्ये समाविष्ट करावे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो.”
— इंजि .प्रणय सोहमप्रभा ,नागपूर
मो. नं . ७०२०९५९४७२

